श्रद्धा आणि उन्माद...
- Kaustubh Savatkar
- Aug 18, 2014
- 2 min read
माझ्या एका मित्राचं स्टेटस वाचून मी जाम हबकून गेलो आहे. त्याने दहीहंडीच्या दरम्यान होणाऱ्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली असली तरी त्या पोस्टचा शेवट मात्र माझ्यासाठी धक्कादायक होता...
"मी तर असंही ऐकतोय... आणि Whats app वर पण हे msgs येतायत की श्रीकृष्ण हा असंख्य गोपिका पटवत होता... त्याच्या सोळासहस्त्र वैगेरे बायका होत्या... (जे माझ्या एकिवात आहे, वाचनात नाही) खरच किव येते या लोकांची... ज्यांना खरा श्रीकृष्ण कधी कळालाच नाही... खरंच ते रिटायर्ड जज योग्य बोलत होते... मी हुकूमशहा असतो तर, 'श्रीमद्भगवतगीता' अभ्यासक्रमात कंपल्सरी केली असती... खरंच काळाची गरज आहे श्रीमद्भगवद्गीता!"
हा त्याच्या स्टेटस चा उर्वरित भाग मी मुद्दाम इथे पुन्हा देतोय... कुठल्या काळाची गरज आहे श्रीमद्भगवद्गीता हे मला काही अजून उमजलेलं नाहीये... द्वितीय अध्यायात पार्थ/अर्जुन काळाकुतीला येऊन भगवंतास म्हणतो, "हे प्रभू, तुमच्या अक्राळविक्राळ रूपाने मी भयभीत झालो आहे, तुमच्या आग ओकणाऱ्या अस्तित्वामुळे माझे डोळे दिपून गेले आहेत." माझ्यामते, अर्जुनाच हे वाक्य पुरेसं बोलकं आहे आणि तितकंच ते आजच्या सामाजिक परिस्थितीचं द्योतक आहे... भयभीत झालेले आणि दृष्टी झाकोळलेले दुर्बल घटक हुकुमशाही वर्चस्व मान्य करतात आणि याचा दाखला इतिहास आणि मानववंशशास्त्र नक्कीच देईन...
राहिला भाग गीतेला आध्यात्मिकदृष्ट्या समजून घेण्याचा आणि त्यातून पारलौकिक अनुभव घेण्याचा तर, हा अत्यंत खासगी मुद्दा आहे असं मला वाटतं... आणि याचं कारणही अगदी स्पष्ट माझ्या डोळ्यांसमोर आहे... मी ज्या इमारतीमध्ये राहतो, त्याच्या मागेच श्रीकृष्ण मंदिर आहे आणि त्याच्या अगदी समोरच एक मस्जिद आहे.... रोज सकाळ-संध्याकाळ तिथे वाजणारी आरती आणि दिवसातून ५ वेळा ऐकू येणारी नमाज यांचा माझ्या अनुभवविश्वावर काय परिणाम होतो?... तर, मी शुन्य म्हणेल... आध्यात्मिक उपासनेची स्थानं ही गर्दी गोंगाटापासून दूरच असावीत असं मला वाटतं... 'श्रद्धा' ही मनाच्या आतल्या गाभाऱ्यातून दाटून आली पाहिजे... तर तिचा काहीतरी उपयोग आहे... नाहीतर आपल्याला गीताही समजत नाही आणि कुराणही... मग कुठे आपण समाजमनावर आलेलं धार्मिक मळभ दूर होऊ शकेल याची आशा करू शकतो...?

Commentaires